BLOG ADDA

Saturday, February 5, 2011

आई!


रविवारची सुंदर सकाळ. त्यात शनिवार रविवार सुट्टी म्हणून मस्त ताणून दिली होती. दुपारी १२ वाजता अस्मादिकांनी डोळे उघडले आणि उठून हॉल मध्ये येऊन tv लावला आनि  सोफ्यावर पुन्हा पसरले. मी उठले हे पाहताच आईने ब्रश करून चहा घेण्याचा तगादा लावला. मी तिच्या मनासारखे केले, पण कंटाळलेल्या चेहऱ्याने . चहा पिऊन पुन्हा tv  बघण्यात मग्न झाले. तितक्यात माझी नजर आईकडे गेली. ती माझ्याकडेच येत होती. तिच्या आवडीची कुठलीशी मराठी लिका  मी लावावी अशी तिची इच्छा होती. मी तिचे तेही म्हणणे ऐकले आणि मालिका लावून "मी भली आणि माझा कम्प्युटर भला" या तत्वावर पुन्हा आत निघून गेले. पण थोड्याच वेळात मला कळले कि आई ती मालिका काही पाहत नाहीये. याचे कारण विचारले असता आतून उत्तर आले, " आत बाहेर इतक्या फेर्या होत आहेत, कि मधले मधले सीन पाहायला मिळत आहेत". यावर मी निरुत्तर झाले, पण डोक्यात एक विचारचक्र सुरु झाले.
 
आई.. एक अविरत चालणार यंत्रच जणू. पहाटे पहाटे उठून नवर्यासाठी किवा मुलासाठी डब्बा बनवणे हे आपले आद्यकर्तव्य  असल्याप्रमाणे चुकता लवकर उठणे. आणि तो डब्बा  बनवण्यासाठीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवणे. त्यांना सकाळी जाण्यापूर्वी चहा बनवून देणे, स्वतः मात्र "मी घेईन नंतर" अस उत्तर देऊन चटकन दुसरी कुठली तरी कामे करण्यास निघून जाणेसगळ्यांच्या आंघोळ्या  आटोपल्यानंतर कपडे धुणे. ते करून होते होते तोच लगेच जेवणाची तयारी. त्यातही गंमत अशी कि घरी कुणी पाहुणे येणार असतील, तर त्यांच्याकरता खास जेवण अन्यथा, केलीय सकाळी डब्ब्याला भाजी तीच होईल दुपारच्या जेवणाला असे म्हणून वेळ मारून नेणे. जेवणे आटपून दुपारची झोप घेण्या ऐवजी शिवणकाम करण्यात कुठला आनंद मिळत असेल बरे? कुठे शर्टाच निघालेलं बटन लाव, कुठे इस्त्रीच कर, कुठे साफ सफाईच कर! जरा म्हणून आराम करण्याची इच्छा नाही; किंबहुना वेळच नाही. कामे आतापाता  आटपता संध्याकाळ झाली म्हणजे मग परत रात्रीच्या जेवणाची तयारी. आणि हे असे चक्र वर्षानुवर्ष सुरूच.
शनिवार रविवारी जगाला सुट्टी असली तर आईला काही सुट्टी नसते. तिची काम सुरूच असतात. बर नुसती  कामेच नाही तर कुटुंबियांची आजारपणे, दुखणी खुपणी, हेहि बघणारी आईच. रात्री खोकल्याची उबळ आल्यावर आपल्या तोंडात गुळाचा तुकडा देणारी आईच. सासरहून माहेरी आलेल्या लेकीला आराम करता यावा म्हणून तिची उठ बस करण्यापासून तिच्या समोर महाराणीसारखे ताट ठेवणारी आईच. मुलाने  पहिल्या पगारातून घेतलेल्या साडीवर आनंदाश्रुंचे थेंब ओघळणारी आई! प्रचंड कष्ट करणाऱ्या आपल्या नवऱ्याला सुख दु:खात साथ देणारी आई. मुलांना खूप शिकता यावे म्हणून दागिने विकण्यास देखील तयार होणारी ती लक्ष्मीसम आई. स्वतःच्या तरुण मुलीची छेड काढणारयाची बकोट धरून त्याच्या कानशिलात लगावाणारी  ती दुर्गेसम आई. तिला त्रास होऊ नये म्हणून "मला डब्बा नकोय आज" असे सांगितले तरी "बाहेरचे कशाला खायला हवे" असे म्हणत डब्बा बनवून बॅग मध्ये ठेवणारी ती प्रेमळ आई. दु:खात आधार म्हनून  आठवणारी आणि सुखात वाटेकरी म्हणून आठवणारी ती एकमेवाद्वितीय अशी आई!
असे म्हणतात कि जगात देव सगळ्यांसाठी तातडीने धावून जाऊ शकत नाही, म्हणून त्याने आई बनवली! देवाचे खूप खूप आभार कि त्याने इतकी अमूल्य अशी स्वतःची प्रतिमा या पृथ्वीतलावर पाठवली आहे. सर्वगुणसंपन्न अशा माझ्या आईला माझे कोटी कोटी प्रणाम!

No comments:

Post a Comment