दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. सकाळचा नाश्ता करायला न मिळाल्यामुळे तुम्हाला कडकडून भूक लागली आहे. अशातच तुम्हाला गुप्त खबर मिळते कि तुमच्या हापिसातल्या खानावळवाल्याने (खानावळ हा योग्य शब्द आहे, कँटीन म्हणाव अस थोर पक्षी:चविष्ट काम काही त्या कँटीन वाल्याने केलेले नाहीये ) काही नवीन (?) पदार्थ विकायला सुरुवात केलेली आहे. हर्षाची लहर मनात उठून तुम्ही थेट त्या कँटीनच्या दिशेने चालायला सुरुवात करता. पोटातले कावळे ४ मिनिटांच अंतर १ मिनिटात पार करायला उद्युक्त करतात. खबर मिळाल्याप्रमाणे खरोखरच तुम्हाला तिथल्या फलकावर, जिथे आधी मोजून ४ नावे दिसायची, एकदम ३० नावे दिसल्यावर तुमच्या आनंदाला पारावर उरत नाही! हि आनंदाची बातमी देणार्याचे मनोमन आभार मानून तुम्ही एक एक पदार्थच नाव वाचायला सुरुवात करता. नावं ओळखीची जरी असली, तरी हापिसातल्या या खानावळीमध्ये पहिल्यांदाच चाखायला मिळणार म्हणून मग तुम्हाला अगदी काय घेऊ आणि काय नको असे झालेले असते. त्यातल्या त्यात उगीच फार "रिस्क" नको म्हणून तुम्ही "वेज हक्क नूडल्स" मागवता.
ऑर्डर यायला बराच वेळ आहे म्हणून मग आजूबाजूला रटाळ चेहरे करून बसलेले आणि तितक्याच रटाळ गप्पा मारणारे कर्मचारी बघत बघत हळूच त्यांच्या पुढ्यात ठेवलेल्या प्लेट्स कडे देखील पाहून घेता. नक्कीच या कँटीन वाल्याचा धंदा एकदम जोरात सुरु झाला आहे अशी तुमची खात्री पटते. कारण प्रत्येकाने त्याच्याकडचा एक तरी नवीन पदार्थ घेतलेला असतो. तुम्ही आपले मनात खुश! बर्याच दिवसांनी हापिसात काहीतरी नवीन आणि चांगल खायला मिळेल या आशेने!
"मॅडम, वेज हक्क नूडल्स रेडी!" कँटीनवाल्याचा चीरकलेला आवाज येतो. सकाळपासून लागलेली भूक शेवटी मिटणार या आनंदात चटकन ती प्लेट घेऊन तुम्ही येता. पहिल्यांदाच हक्का नूडल्स पिवळ्या रंगाचे पाहत असता, मनात शंकेची पाल चुकचुकते. पण 'असेल काहीतरी चविष्ट! बघूया तरी खाउन' अस म्हणत पहिला घास घेता. खाताना काय माहित का पण डोळे मिटले जातात. कदाचित पुढे येणाऱ्या प्रसंगाची खात्री करण्यासाठी ते पुन्हा उघडता यावेत, या साठी असेल! तोंडांत तो पहिला घास गेल्या गेल्या जाणवते "अरे! मी कांदे पोहे का खाते आहे! मी तर 'वेज हक्क नूडल्स' मागवले होते!". आपण नक्की नूडल्सच उचलून आणले आहेत न याची खात्री करण्यासाठी तुम्ही डोळे नीट उघडून पुन्हा पुन्हा पाहता. दुर्दैवाने ते नूडल्सच असतात! फक्त असे नूडल्स कि जे कुणी बारीक किलकिल्या डोळ्यांच्या त्या परदेशी लोकांनी पहिले असते, तर फीट येऊन तिथेच आडवे झाले असते. कांदेपोहे बनवण्याच्या कृतीत फार काही नाही, पण फक्त भिजवलेले पोह्यांऐवजी उकडलेली हक्का नूडल्स टाकले असावेत. बाकी अगदी राई, जिर्याच्या फोडणीपासून हळद, मिरची आणि भरपूर कांदा इथपर्यंत साहित्यात तसूभर देखील फरक नसतो, बर का! तुमच्या मनात येते, त्या नूडल्स तशाच उचलून कँटीन मॅनेजर च्या तेलकट केसांवर ओताव्यात! पण रागावर तथा हातांवर संयम ठेवून तुम्ही मुकाट डोळे मिटून त्याच कांदेपोहे कम नूडल्स चा एक एक घास तोंडात घेता! कारण पोटातले कावळे अजून शांत झालेले नसतात. आजूबाजूला सहज लक्ष जाते आणि डोक्यात लक्ख प्रकाश पडतो! मघाच्या 'त्या' रटाळ चेहर्यांमागच गूढ आता तुम्हाला एकदम उकलत.
मनातल्या मनात त्या मॅनेजर च्या कुळाचा उद्धार करत त्याचे पैसे चुकते करून तुम्ही चूपचाप कँटीनबाहेर पडता. आणि त्या क्षणाला हातात तलवार नसली तरी जिभेच्या धनुष्यावर शब्दांचे बाण चढवून जीव घेण्यासाठी तुम्हाला शोध असतो फक्त एकाच व्यक्तीचा .. ज्याच्याकडून तुम्हाला 'ती' गुप्त खबर मिळाली होती!
हक्क नूडल्स आणि पोह्याची चव ..
ReplyDeleteट्राय करायला हरकत नाही :)
छान लिहलय
"hakka noodles" ani "manchao soup" chya jagi..."haq ka noodle"...ani "man chahe wo soup"..mhanayla harkat nahi tar...hehe
ReplyDelete